Friday 26 July 2013

भीमसेन


एका सकाळी उठलो आणि टी.व्ही. लावला. सगळ्या न्यूज चॅनल्सवर बातमी झळकत होती, “भारतरत्न पं.भीमसेन जोशी कालवश!” आम्ही सारेच ह्या बातमीने विषण्ण झालो. दिवसभर ज़ाऊ तेथे, भेटेल त्याच्याशी हीच चर्चा आणि गाण्यातल्या लोकांचेकिस्से’. खरंच, पंडित भीमसेन जोशी नावाचा एक प्रचंड माणूस, त्या बुलंद आवाज़ाचं तप:पूर्त गाणं आपल्याला सोडून गेलं होतं खरं, पण लगेच दुसरा विचार आला, आज़वर ह्या माणसानं जे उदंड करून ठेवलंय ते ज़ाणार कुठं? भीमसेन म्हणजे कांही लेखक किंवा भाष्यकार नव्हे, पण भीमसेनी गाणं म्हणजे शंभर टक्के स्वच्छशास्त्रआणि ते ही यमा-नियमांचा नुसता रवंथ नव्हे तर, शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठ्ठा महाल उभा केल्यासारखं! अनेक रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ यांच्या स्वरूपात भीमसेन सतत आपल्यासोबत राहणार आहेतच.

अनेक दिवस वेगवेगळे किस्से ऐकतच होतो. भीमसेन जोशींचं सवाई मधलं शेवटचं गाणं हे असंच तीनेक वर्षांपूर्वीचं! मित्र सांगत होता, अनाउन्समेंट झाली की भीमसेन जोशी येताहेत आणि गाण्याची शक्यता आहे. तुडुंब भरलेली संपूर्ण रमणबाग फ़ोनवर गेली आणि हा हा म्हणता माणसं गोळा झाली. बाहेरचे रस्ते भरले, तिथे सुद्धा स्पीकर्स लावले गेले! माणसांना उभं रहायला देखिल ज़ागा उरली नाही. पं.भीमसेन जोशी नावाचे अत्यंत तपोवृद्ध गायक स्टेजवर आले. साधारणपणे गाणाऱ्यांचे गळे वृद्धापकाळाने थकतात, कापरे होतात, पण केवळ आदर म्हणून लोक त्यांचं गाणं समजून-उमजून घेतात. तुडुंब भरलेल्या सवाईच्या मंडपात पंडितजींची अनेक वर्षं साथ करणारे भरत कामत आणि सुधीर नायक, तानपुऱ्याला शिष्य अशी बैठक ज़मली. भीमसेन इतके वृद्ध आणि थकलेले की त्यांना कुणीतरी आधार देऊन बसवलं होतं. गाणं सुरू झालं आणि उमटले, तलवारीची पात चमकावी तसे तेजस्वी सूर! अगदी पूर्वीसारखेच. शरीर थकलं परंतू सुरांना जरेची बंधनं अडवू शकली नाहीत. पूर्वीइतकाच खडा सूर, तानेची तशीच सुरेल हरकत आणि आवाजी मधली तीच अफ़ाट ताकद. गाता गाता शिष्यानं, गुरू तिथे पोचण्या आधीच तार षड्ज लावला... भीमसेनजींनी त्याच्याकडे हलती मान वळवून नुसतं पाहिलं, आणि ऐंशीवर वय पार केलेल्या त्या माणसानं तारसप्तकातला तीव्र मध्यम लावला... या प्रसंगी, बुज़ुर्गांचं माना लवूनहं!” म्हणणं, समवयस्क-समकालीन गायकांचंवाह!”, आमच्यासारख्या गाण्या-वाज़वणाऱ्यां, या स्वरभास्कराकडे केवळ भक्तिभावानं बघणाऱ्यांचंयह बात है!”, आणि सामान्य रसिकांचंक्या बात है”; हे सारे स्तब्ध होते! तिथे लोटलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात त्या गाण्यानं अश्रू उभे केले. माणूस अन् माणूस रडलं, फ़ोनवरून ऐकणारे रडले, मनात कुठेतरी भीमसेन नावाच्या पराक्रमी गायकाचं हे शेवटचं गाणं म्हणूनही असेल पण परत ज़ाताना त्यांच्या कार समोर लोक लोटांगण घालत होते, कुणी पायधूळ कपाळाला लावतोय, हे दृष्य कांहीतरी अलौकिक आणि विलक्षण होतं.

भीमसेन हे लहानपणीही आडदांड प्रकरण होतं! कब्बडी, फ़ुटबॉल, स्लो सायकलिंग्, पोहण्यात प्राविण्य आणि योगासनं. बालवयात कर्नाटकातील आपल्या गदग या गावी भीमसेन विसेक रागांची तोंडओळख होईल इतकं शिकला होता. मग गाण्याची आबाळ होऊ लागल्यानं तो मुंबईला पळून गेला. घर मोठं प्रतिष्ठित पण पैशाच्या बाबतीत परिस्थिती बेताचीच होती. वडील गुरुराज जोशी परिस्थितीवश ह्या गुणी मुलासाठी काही करु शकत नव्हते. पहिल्यावेळी भीमसेन मुंबईला ज़ाऊन खस्ता खात परतीच्या वाटेवर विजापूर पर्यंत कसाबसा पोचला, आप्तेष्टांनी ओळखून घरापर्यंत आणून सोडलं. या नंतर घरच्यांनी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गुरु गवयांकडे भीमसेनला शिकवण्याचे प्रयत्न केले. परंतू त्याला ते गाणं पटत नव्हतं. कानावर उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांचं गाणं गुंजत होतं, भीमसेन त्या गाण्याच्या शोधात होता. घरून इच्छा असूनही काहीच करता येण्यासारखं नव्हतं. त्यामुळं भीमसेननं वडील एम्.. ची परीक्षा देण्यासाठी मुंबईला ज़ाण्याचं निमित्त साधून दुसरं पलायन केलं. याला लौकिक अर्थानंपलायनम्हटलं तरी हे किती मोठ्ठंधाडसहोतं याची पूर्ण कल्पना भीमसेनला आधीच्या अनुभवामुळे होती, पण हे तितकंच आवश्यक हेतूगर्भ होतं.

बारा वर्षाच्या भीमसेननं आधी पुणं गाठलं. मास्टर कृष्णरावांची फ़ी परवडण्यासारखी नव्हती. अंगावर धड कपडे, खायला पैसा नसलेल्या एकलव्यानं ही गुरुदक्षिणा द्यावी कुठून? मग तिथून त्यानं मुंबई गाठली. मुंबई ते ग्वाल्हेर असा प्रवास छोट्या भीमसेननं केवळ गाण्याच्या अनवट वेडापाई केला. गाडीतल्या लोकांना गाणी ऐकवून पैसे, खाणं गोळा करत ह्या मुलानं खडतर प्रवास केला. त्या काळच्या उच्चभ्रू संस्कारातील ब्राम्हण कुटुंबातल्या ह्या पोराचं हे असलं धाडस विस्मयकारक होतं. ग्वाल्हेरला भीमसेन, पं.राजाभय्यांकडे गेला. पण भीमसेनचा ओढा त्या गायकीकडेही नव्हता तरी तो एक मोठा आधार होता, त्यांच्याकडे शिकण्यामुळे दोन वेळच्या पोटा-पाण्याची सोय होत होती. तिथेच आज़चे ख्यातनाम सरोद वादक अमजद अली यांचे पिता हाफ़िझ अली हे मोठे विद्वान गायक-सरोदिये होते. भीमसेन त्यांच्याकडेही शिकत असे. खासकरूनमारवाह्या एकाच रागाची तयारी खाँ साहेबांनी कसून करून घेतली. राजाभैय्यांनी भीमसेन तिथे रमत नाही हे पाहून खरगपुरला त्यांचेच शिष्य केशवजी यांच्याकडे पाठवलं. पण ते शिकवण्या घेत... तिथेगाणंनाही मिळालं! मग भीमसेन कलकत्याला पहाडी सन्याल यांच्याकडे गेला. ते उत्तम गायक आणि सिनेनट होते. त्यांनी भीमसेनला चित्रपटात काम करण्याचा आग्रह धरला आणि तिथेच सारं फिसकटलं. भीमसेन कलकत्याहून दिल्लीला गेला.

इतर ठिकाणांप्रमाणेच दिल्लीमधेहीगुरूलोकांची शोधा-शोध झाल्यावर नासिरुद्दीन खाँ हे दिल्ली घराण्याचे श्रेष्ठ गायक त्याला गंडा बांधण्याची अट घालून बसले. घरदार सोडून गाणं शिकण्यासाठी दूरवर भटकत आलेला हा एकाकी मुलगा गंडा बांधण्याचे हज़ार-दोन हज़ार कुठुन आणणार? आणि तशात भीमसेन ज़ाऊन धडकला ते जन्मात कधी नावही ऐकलेल्या पंजाबातल्या ज़लंधर गावी ! त्या अज्ञात ठिकाणी सुद्धा भीमसेनला छत्र मिळालं आणि पं. मंगतराम यांनी त्याला धृपद गायकीचं शिक्षण द्यायला सुरवात केली. तिथेही भीमसेन अत्यंत कर्मठ प्रवृत्तीने राहात असे. रोज़ बर्फ़गार पाण्याने आंघोळ, हज़ार हज़ार ज़ोर, बैठका मग दोन तास रियाझ, फराळ, पुन्हा रियाझ, दुपारचं जेवण, पुन्हा रियाझ, आणि दिवसभरात पडतील ती कामंही सांभाळायची. हे सारं करताना कमी बोलणं असा क्रम असे. त्यातही घराची आठवण अजिबात काढणं. त्या वर्षी भीमसेन, हरिवल्लभ संगीत संमेलनात गेला आणि अनेक गायक वादकांची तानपुऱ्यावर साथ केली. प्रत्येक गायक-वादकाला विचारलेला, एकच प्रश्न, गाणं कुणाकडे शिकू? दुसऱ्या वर्षी पं. विनायकबुवा पटवर्धन तिकडे आले, त्यांनी भीमसेनला गायला लावलं आणि त्याची गाण्याची शैली ऐकून पं. रामभाऊ कुंदगोळ उर्फ़ सवाई गंधर्व यांच्याकडे शिकण्याची आज्ञा केली. म्हणजे उत्तरेकडे भटकत भटकत आलेल्या ह्या नावेला पुन्हा दक्षिणेचाच समुद्र खुणावत होता. आणि मग भीमसेनच्या स्मृतीपटलातलं सवाई गंधर्वांचं गाणं ज़ागं झालं आणि ते मिळवण्यासाठी स्वारी पुन्हा गदगच्या दिशेने निघाली. घरचीही ओढ होतीच, घरी पत्र पाठवलं आणि हे वासरू आईकडे परत गेलं.

पं. सवाई गंधर्व हे कुंदगोळ गावचे, आडनांव सौंशी. गावचं कारभारी पद पिढीजात चालत आलेलं. पण लहानपणापासूनच गाण्याचा ध्यास घेतल्यामुळं वडिलांनी कारभारातून मुक्त केलेलं. आणि म्हणूनच सुदैवानं भीमसेन इतक्या खस्ता त्यांना खाव्या लागल्या नाहीत. रामभाऊंचा आवाज़ वयात येताना खूप पसरट झाला होता आणि म्हणून त्याना रूक्ष आवाज़ात गोडवा आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा गंडा बांधून महत्प्रयासानं रामभाऊंनी विद्यार्जन केलं. . अब्दुल करीम खाँ हे त्या काळाच्या मानानं खूप पुढारलेले आणि मिशनरी प्रवृत्तीचे गवई आणि गुरू होते. इतरांप्रमाणे त्यांनी कधीच आपल्या शिष्यांकडून शारीरिक सेवा-मेहनत करून घेतली नाही. ते अत्यंत पद्धतशीर शिक्षण देत. खर्ज, सुरांचा लगाव, आवाज़ाचं वज़न, लयीचं माप, वेगवेगळ्या रागांकडे बघायचा दृष्टिकोन . गोष्टीं ते अत्यंत बारकाव्यांनिशी शिकवत. मेहनती रामभाऊंनी ही शिस्त कडकपणे पाळलीही. गुरूच्या आवाज़ाची ज़ातकुळी पातळ सुरेल आणि मुलायम असूनही मेहनती रामभाऊंनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रूक्ष आणि करड्या आवाज़ातही ती गायकी घटवून आत्मसात केली. यावरही स्वत:ची शैली निर्माण केली आणि किराना घराण्यातही आक्रमक बाज़ आणला. असे गुरू भीमसेनला लाभले.

भीमसेन जालंधरहून परत आल्यानंतर वडील गुरुराज जोशी यांनी प्रयत्न करून सवाई गंधर्वांकडे त्याचं शिक्षण सुरू करून दिलं. आधीचं सारं शिक्षण विसरण्याच्या अटीवर सवाई गंधर्वांनी गाणं शिकवण्याचं कबूल केलं. रामभाऊंनी भीमसेनलापूरीयारागाची तालीम द्यायला सुरवात केली. पहाटे खर्जाचा रियाझ, सकाळची तालीम मग न्याहरी आणि पाणी भरणं यासारखी कामं! त्या नंतर पलटे आणि संध्याकाळी पुन्हा तालीम. तिथलं दोनवेळचं जेवण भीमसेनला पुरत नसे पण विद्द्यार्जनासाठी ही उपासमारही त्यानं सहन केली. वडील गुरूराज जोशी आपल्या केवळ शंभर रुपये पगारातले, पंचवीस रुपये भीमसेनच्या गायनाची फ़ी म्हणून सवाई गंधर्वांना देत असंत! असं सुमारे वर्षभर चाललं आणि एके दिवशी सवाई गंधर्वांनी कांहीही कारण देता भीमसेनचं शिक्षण बंद करून त्याला घरी नेण्याचा निरोप वडीलांकडे पाठवला.

जेंव्हा सवाई गंधर्वांनी शिकवणं बंद केलं तेंव्हा भीमसेननं साथिदारांबरोबर रियाझ सुरू केला. गुरुराज जोशींनी मुलाच्या फ़ीचे पैसे साथिदारांवर खर्चले. रामभाऊंच्या वर्ष-दीड वर्षाच्या तालमीवर भीमसेननं मेहेनत घ्यायला सुरवात केली. इतर शिष्यांना मिळणारी तालीम ऐकलेली, गुरूचं स्वत:चं गाणं हे सारं भीमसेननं एकलव्याच्या निष्ठेनं आत्मसात केलं, घासून पुसून लख्ख केलं. आठवडाभर घरी बसून मेहनत आणि आठवड्याच्या शेवटी बैठक असा क्रम सुरू केला. संपूर्ण गदग गानवेडं झालं. अशक्य कोटीतली वाटणारी गोष्ट म्हणजे, आठ-आठ तासांच्या बैठका केल्या. बारा बारा तास रियाझाचे घन फोडणाऱ्याची ही भीममैफ़ल आठतासांची नसती तरच नवल! येथे एक उल्लेख करणं आवश्यक वाटतं, की गळा हे कांही वाद्य नव्हे! तो एक अवयव आहे आणि जेष्ठ संगीततज्ञ डॉ. अशोक दा. रानडे म्हणतात त्या प्रमाणे अन्न गिळण्यास मदत करणाऱ्या या अवयवाचा बोलणं हा कृत्रिम उपयोग आहे आणि गाणं हे तर खूपच नंतरचं. म्हणूनच गळ्यातील स्वरयंत्र हे कांही इतर स्वर वाद्यांसारखं वापरता येत नाही. सामान्य गायक या नाज़ूक अवयवाचा कितीही उपयोग करत असला तरीही इतक्या प्रचंड रियाझाचा विचार करू शकत नाही.

या बद्दलचा एक किस्सा म्हणजे, भीमसेनजींचे साथीदार विमानाची वेळ होईपर्यंत एअरपोर्ट्वर गप्पा मारत होते. गाण्या-बजावण्यातली मिष्कील माणसं आणि त्यांच्या तशाच मिष्कील गप्पा. एकज़ण म्हणाले की पंडितजी बारा-बारा, चौदा-चौदा तास रियाझ करायचे म्हणे खरं असेल का हो? भीमसेनजींनी डोळे मिटलेले होते, हे पाहून दुसरा म्हणाला, कुणाला माहिती अरे? पण कसं शक्य आहे ते... गळा म्हणजे कांही वाद्य नव्हे, मला अशक्य कोटीतली गोष्ट आहे...! अचानक मागून आवाज आला, “बारा-बारा तास मैफ़िली केल्या आहेत मी !” कुठलाही गाणारा माणूस इतकी प्रचंड मेहनत घेऊ शकतो हे केवळ आश्चर्यच म्हणावं लागेल. अनेक लोकांकडून ऐकायला मिळतं की भीमसेनजींचे दोन-दोन वेळा साथीदार बदलले पण मैफ़ल सुरूच राहिली.

सवाई गंधर्वांनी शिकवणं बंद केल्याच्या मधल्या काळात सोळा वर्षांच्या भीमसेननं, रियाझाच्या शिदोरीवर दौरे केले. छोट्या-मोठ्या अनेक मैफ़िली केल्या, रंगवल्या अणि या साऱ्यातून कलाकारासाठी सर्वात महत्वाचा असाआत्मविश्वाससंपादन केला. परवडण्यासारखं नसूनही आप्तेष्टांच्या हट्टाखातर वडील गुरुराज जोशी भीमसेनला रेडीओची ऑडिशन द्यायला मुंबईला घेऊन गेले. तिथे मैफ़िली करता आल्यानं हा दौरा तसा निराशाजनकच ठरला पण नंतर ही टेस्ट भीमसेन पास झाल्याचं कळलं. त्या वेळी मुंबईत राहाण्याची अडचण असे, सगळी मंडळी एकाच हॉल मधे झोपत असंत. त्यांना त्रास नको म्हणून भीमसेन संडासात ज़ाऊन रियाझ करायचा! इतकं तीव्र ऑब्सेशन आणि प्रखर निधिध्यास तसाच निर्धार त्या तरूण भीमसेनचा होता. रामभाऊंनी शिकवणं बंद केल्याच्या मधल्या काळात भीमसेन त्यांचं गाणं चोरून ऐकत असे. इतर शिष्यांना दिली ज़ाणारी तालीमही भीमसेननं ऐकून आत्मसात केली. भीमसेननं अनेक राग आणि अनेक बंदिशी अशा दूरस्थ शिक्षणातून शिकून तयार केल्या.

अशी उपेक्षा चाललेली असताना अचानक एके दिवशी भीमसेनला कुंदगोळला घेऊन येण्यासाठी निरोप आला. भीमसेनचे काका आणि विष्णुपंत महाशब्दे यांनी भीमसेनची तालीम पुन: सुरू करण्याचा आग्रह धरला आणि त्याच दरम्यान पंचाक्षरी बुवांचा आपल्या शंभरेक शिष्यांसह गदगला दौरा झालेला पाहून आपलाही एखादा खंदा, बंदा रुपया असावा असं सवाई गंधर्वांना वाटलं असावं ! त्यांनी भीमसेनची संथा पुन्हा सुरू केली. दिनक्रम तसा सरळ पण अत्यंत कष्टाचा होता. पहाटे चार ते सहा खर्ज़ भरणे. मग सकाळी अकरा वाज़ेपर्यंततोडीची तालीम, जेवणखाण घरकाम झाल्यावर दुपारी चारलामुलतानीआणि संध्याकाळीपूरियाअसे तीन राग खूप घोकून घेतले. भव्य गंडाबंधन समारंभ करून भीमसेनजींनी सवाई गंधर्वांचा गंडा बांधला, पण ही तालीम सुरू असतानाच सवाई गंधर्वांची तब्येत खालावली आणि हे शिक्षण फारकाळ चाललं नाही. सवाई गंधर्वांना अर्धांगवायूचा त्रास होऊ लागला, डॉक्टरांकडून त्यांना गाण्याची सक्ती करण्यात आली आणि एका तेज:सूर्यानं आपला भार दुसऱ्या तेज:सूर्याला द्यावा तसं झालं! भीमसेन मैफ़िली जिंकू लागला. खडकफोड मेहेनत तर अखंड सुरूच होती.

या नंतरही भीमसेन जोशींनी जिथून जे मिळेल ते शिकणे आणि आत्मसात करणे असा नेम सुरूच ठेवला. ज्ञानार्जनाची प्रक्रीया सुरूच ठेवली. याच ध्यासातून रामपुरला सहा महीने राहीले, ठुमरीचा आपला नवा बाज निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षेने लखनौ इथंही वर्षभर केवळ उपशास्त्रीय संगीत ऐकलं. जेंव्हा सवाई गंधर्वांचा षष्ठ्यब्धीपूर्तीचा सोहळा पुण्यात साजरा झाला तेंव्हा केवळ भीमसेन हा एकच शिष्य तिथं गायला होता. अनेक थोरा-मोठ्यांच्या पंक्तीत भीमसेनला केवळ पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. ती मैफ़ल भीमसेननं अक्षरश: गाजवली! सगळीकडे खूप नांव झालं. यानंतरही भीमसेन जोशी हे नांव अत्युच्य शिखरावर पोचायला पंधरा वर्षांहूनही जास्त काळ लागला.


खासगी आयुष्यात भीमसेन जोशींचे दोन विवाह झाले, पहिल्या पत्नी सुनंदा ह्या नात्यातल्याच! त्यांच्यापासून भीमसेनजींना राघवेंद्र, उषा, सुमंगला आणि अनंता अशी चार मुलं झाली. वत्सलाबाईंबरोबर त्यांचं प्रेम तब्बल दहा वर्षे चाललं आणि या विवाहानंतर त्यांना जयंत, शुभदा, लक्ष्मी आणि श्रीनिवास अशी अपत्यं झाली. शिवाय उपेंद्र भट, माधव गुडी, आनंद भाटे . शिष्यमंडळी अगदी घरच्यासारखीच! पंडितजींना मोटारीचा दांडगा शौक आणि ती मोटार स्वत: अफाट वेगानं चालवणं हे वेड!

गाण्यातली सततची मेहनत, अखंड प्रवास, मैफ़िली आणि या क्षेत्रातील सगळ्या स्पर्धांना तोंड देत, पं.भीमसेन हे नांव खूप खूप मोठं झालं. सुरवातीला, “भाग्यश्री”, “परिवर्तन”, “नल-दमयंतीया संगीत नाटकांमधून त्यांनी कामं केली. “संतवाणीसारख्या कार्यक्रमातून उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं. चित्रपटातही गाऊन पुरस्कार मिळविले. भीमसेन जोशी हे नांव केवळ सततचं गाणं आणि वैविध्य यामुळेच वर आलेलं नाही तर त्यांच्या गाण्यात दर्जेदारपणा होता. खासकरून ख्याल आणि भजन या दोन गायनप्रकारांत त्यांनी आपली खास शैलीच निर्माण केली.

भीमसेनजींचा ख्याल म्हणजेबडा ख्यालहे नांव सार्थ करणारा! तास दीडतासाची सहज़ व्याप्ती. बेहलावे घेत खर्जापासून तार सप्तकापर्यंतची आरोही आणि अवरोही बढत! तार षड्जावरचा पर्वत-कड्याइतकाच निवांत ठेहेराव! आणि मग तानांचा मुसळधार पाऊस. विजा कडकडाव्यात तशा चक्राकार, सरळ, आरोही-अवरोही तीनही सप्तकात संचार करणाऱ्या ताना. श्रोत्यांना, हा माणूस नक्की किती फ़ुप्फ़ुस्सांचा दमसाँस ठेऊन गातोय? ह्या विचाराने थक्क करून सोडणारा महान भीमसेन! खर्जाला सुरू झालेली, तारमध्यम म्हणता म्हणता फ़िरून तारधैवत लावून येणारी तोडीतली तान ऐकून कोणाचा जीव गुदमरणार नाही? आपलं गाणं कधीच कंटाळवाणं होऊ नये याची त्यांनी सतत काळजी घेतली आणि हे त्यांनी लिलया साधलं यात त्यांची साधना सहज दिसते.

पं.भीमसेन जोशी हे नांव आज पराकोटीचा मानदंड आहे. त्यांची उंची गाठणं तर दूर राहिलं पण त्यांची नक्कल करू पहाणाऱ्यांचंही हसं होतं. अनेक थोरा-मोठ्यांनी भीमसेनजींना नावाज़लं; पद्मश्री, पद्मविभूषण आणि भारतीय प्रजासत्ताकातील सर्वोच्च सन्मान भारतरत्नही त्यांना प्राप्त झाला. पण याही पलीकडे त्यांनी मिळवलं ते, रसिकांच्या मनातलं अढळ धृवस्थान. अशा देवतुल्य माणसाकडून खूप शिकायला मिळालं, आम्हा विद्यार्थ्यांना, गाणाऱ्यांना आणि अभ्यासकांना! भीमसेन जोशींसारखे लोक अनेक नवीन मार्गांनी आपलं आयुष्य घडवतात आणि पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतात. अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल सांगण्यासारखं अजून प्रचंड आहे परंतू, लेखन सीमा.



- लक्ष्मीकांत


© Laxmikant G. Bongale

This content is restricted to the “sangeetvichaar.blogspot.com” and not permitted to be posted anywhere else on internet nor allowed to be regenerated in any other form or media. Violation of the copyright law will subject to the legal action against the person/entity responsible for same